नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. या सुनावणीला स्वत: शरद पवार उपस्थित होते. ही सुनावणी आता संपली असून पुढील सुनावणी येत्या सोमवारी 4 वाजता घेतली जाणार आहे.

या सुनावणीत  दोन्ही गटांकडून मोठे दावे-प्रतिदावे करण्यात आले. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांची संख्या महत्त्वाची आहे आणि आमच्याकडे सर्वाधिक आमदार असल्याचा दावा अजित पवार गटानं केला, तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून पक्ष कोणाचा हा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह न गोठवता आम्हाला द्यावा, असे शरद पवार गटाने आयोगात म्हटले आहे.

सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोधी पक्षाकडून खोटी कागदपत्रे दाखवण्यात आली, तसेच आमची बाजू न ऐकताच निर्णय घेतल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला आहे.तसेच मृत पावलेल्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत, काही जण वेगळ्या पक्षाचे आहेत ते पक्षाचे आहेत, असे दाखवले असून काल्पनिक वाद आयोगासमोर मांडण्यात आल्याचे ते म्हणाले.

आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला.  जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असेही या गटाने म्हटले आहे. तसेच यावेळी अजित पवार गटाकडून संख्याबळही आमच्याकडेच आहे, हे सुद्धा आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील 5 पैकी 1 व राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे.