मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असल्याने लावण्यात आलेले कडक निर्बंध ५ टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक असून त्याचा प्रसार वेगानं होत असल्याचं आढळून आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागानं तातडीनं नवे आदेश काढले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटातच करण्याचा ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

संसर्गाचा दर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कितीही कमी झाली तरी यापुढं राज्यातील सर्व जिल्हे निर्बंधांच्या दृष्टीनं तिसऱ्या स्तरावरच असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यामुळे सध्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर असलेले जिल्हे थेट तिसऱ्या स्तरावर आले आहेत. त्यामुळं त्यांना नव्यानं निर्बंधांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

काय आहेत तिसऱ्या गटातील निर्बंध ?

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ पर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार, रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंगसाठी पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा असेल. खासगी आणि शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडिओत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार. ते सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधीसाठी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोनपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.