नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना ऐनवेळी त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध होण्याकरिता प्रयत्न सुरू असतानाच भाजापाने मोठा दावा केला आहे. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आज स्पष्ट केली.

भाजपातर्फे आम्ही राजेंद्र विखे-पाटील यांच्या नावाचा विचार करत होतो. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता; मात्र सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका राजेंद्र विखे- पाटील यांनी मांडली. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली. आता आम्हाला दिसतेय की, ही अपक्ष निवडणूक होईल. भाजपाने अजून कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी भाजपाकडे पाठिंबा मागितल्यास विचार करु’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत नाशिक मतदारसंघात बिनविरोध निवडणूक होण्याकरता आम्ही प्रयत्न करू, असे सत्यजित तांबे यांनी आज सकाळीच स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपाची मदत घेतली जाईल का, हे पाहावे लागणार आहे.

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रसने उमेदवारी दिली होती; मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आला; परंतु तांत्रिक अडचणींमुळे सत्यजित तांबेंनी दोन अर्ज भरले. त्यामुळे आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत सत्यजित तांबे यांनी माहिती दिली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या साऱ्या घडामोडीची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुतराम कल्पना नव्हती.