गडचिरोली : देशात सत्ता काबीज करण्यासाठी जातीजातींमध्ये भांडणे लावून भाजप दुफळी निर्माण करत आहे. संपूर्ण देशाची लूट करून केवळ उद्योगपतींचे खिसे भरले जात आहे. देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडवून देश तोडू पाहणाऱ्या भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून हद्दपार करा व देश वाचवा असा जोरदार प्रहार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर केला. ते काँग्रेसचे चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सभेत बोलत होते.

उन्हाच्या तडाख्यात पण विदर्भातील प्रचारात काँग्रेसने प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. आज विदर्भातील जागांवर प्रचारासाठी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची विशेष उपस्थिती होती. या दोन्ही सभेस सभेस काँग्रेसचे खासदार मुकुल वासनिक ,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, इंडिया आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर, डॉ नामदेव कीरसान तथा महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशातील सरकार हे भूलथापाचे राजकारण करून जनतेची फसगत करीत आहे. अशा निष्ठूर सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये गाफिल न राहता महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून निवडणुकीत बरोबरीची टक्कर द्या असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.. तर आपल्या भाषणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर मध्ये प्रतिभा धानोरकर विजयी होणारच असा विश्वास व्यक्त करत आपल्या विशेष शैलीतून भाजपाचा समाचार घेतला. सत्तेतील मनुस्मृति भाजप सरकारचा संविधान संपवण्याचा घाट असून देशातील घटना बदलवून देशाला गुलामगिरीच्या काही लोटण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले. तर इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊ देश उभारणीत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे आयोजित सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेल्या भाजपचे अशोक नेते यांच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला. आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्या तसेच ओबीसींचे आरक्षण हिरावणाऱ्या भाजप सरकारला विजय वडेट्टीवार यांनी खडे बोल सुनावले.

नप्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या भाजप खासदाराने जनतेचा भ्रमनिरास करून जनतेला वाऱ्यावर सोडून क्षेत्राचा विकास न केल्याने आज भाजप उमेदवारावर नामुष्कीची पाळी आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली रखरखत्या उन्हातही इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराची धुरा सांभाळून चंद्रपूर -वनी -आर्णी लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर व गडचिरोली -चिमूर लोकसभा उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांच्या प्रचारार्थ न थकता सलग दोन सभा घेऊन पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचविले. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या व घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली.