गडहिंग्लज (प्रतिनिधी) : दोन मुलांसह एक विधवा नदीपात्रात आढळून आली; त्यात दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यु झाला तर त्या विधवा महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र त्या दोन्ही मुलांवर पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अश्विनी पाटील असे त्या महिलेचे नाव असून अथर्व (वय ७) आणि श्रीराज (वय ४) अशी त्या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. तर दुंडापा कृष्णा पाटील, अजित दुंडापा पाटील (दोघे रा. करंबळी) व मारुती भीमा फुटाणे (रा.नूल) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास नूल (ता. गडहिंग्लज) येथे ही घटना घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूल येथील अश्विनी हिचा विवाह कांही वर्षांपूर्वी करंबळी येथील हरीशचंद्र पाटील यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी हरिशश्चंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर अश्विनी ही दोन्ही मुलांसह तिच्या माहेरी नूल येथे राहत होती. दरम्यान आज दुपारी ती दोन्ही मुलांना सोबत घेऊन गवत आणण्यासाठी अनिल मुत्नाळे यांच्या शेताजवळ गेली असता दोन्ही मुलांसह हिरण्यकेशी नदीपात्रात आढळून आली. तिघांना स्थानिकांनी पत्राबाहेर काढले पण त्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता तर अश्विनी बेशुद्धावस्थेत होती. तिला रुग्णालयात दाखल करून दोन्ही मुलांवर करंबळी येथे घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.

हा प्रकार आत्महत्येच्या प्रयत्नाचा असल्याने नूलचे पोलीस पाटील परशुराम सरनाईक यांनी याबाबत हलकर्णी पोलिसात याबाबत वर्दी दिली. त्यानुसार अश्विनी हिचे वडील मारुती फुटाणे व तिचे करंबळी येथील नातेवाईक दुंडापा आणि अजित पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला