मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड येथे गेली अनेक वर्ष नगर परिषदेच्या अपुऱ्या जागेत दुय्यम निबंधक कार्यालयाचे काम सुरु आहे. त्याला शासकीय स्वतंत्र जागा द्यावी, अशी मागणी अशी मागणी खा. संजय मंडलीक यांच्याकडे मुद्रांक विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी खा. मंडलीक यांनी तातडीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, दुय्यम निबंधक श्रेणी- १ चे मुरगूड कार्यालय सन २००५ पासुन मुरगूड नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी, नक्कल, मुल्यांकन मागणी आणि अन्य इतर कामासाठी दररोज अनेक पक्षकार भेट देत असतात. त्यामध्ये महीला, वृध्द, अपंगांचा समावेश असतो. मात्र, येथे जागा अपुरी असल्याने अभ्यांगतासाठी स्वंतत्र बैठक व्यवस्था नाही. तसेच स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. या कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने पावसाळयाच्या दिवसात रेकॉर्डरुममध्ये गळती लागून रेकॉर्ड खराब होण्याची शक्यता जास्त आहे.

तसेच कार्यालयीन वेळेनंतर येथे काही मद्यपी लोकांचाही वावर सुरु होतो. काही व्यक्ती याठिकाणी कचरा टाकून कार्यालयीन परिसर अस्वच्छ करतात. याबाबी दुय्यम निबंधक कार्यालयाने नगरपरिषेदेस लेखी पत्राद्वारे कळविल्या असून त्यावर अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. यासाठी कार्यालयाने स्वंतत्र जागा मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला लेखी कळवले आहे. मात्र, अद्यापपर्यंत याला जागा मिळालेली नाही. तरी ही जागा मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.