कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी आपल्याला दिलीय. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशिल आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा अखंडपणे सुरु ठेवण्याबरोबरच कोल्हापूरच्या हवाईसेवेने अन्य 5 शहरेही जोडण्याचा मनोदय खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच कमी दृश्यमान असतानाही विमान उतरण्यासाठी आयएलएस सिस्टीम आणि 180 सिटर एअर बस सुविधा या विमानतळावर सुरु करण्यासंबंधी यावेळी चर्चा झाली.

भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार आज कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून सध्या कोल्हापूर विमानतळावर सुरु असणार्‍या विस्तारित आणि आधुनिक टर्मिनल बिल्डिंगच्या कामाचा आढावा त्यांनी घेतला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी संजीवकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. आजवर झालेल्या टर्मिनल इमारतीच्या बांधकाम प्रगतीबद्दल संजीवकुमार यांनी समाधान व्यक्त केले. १० डिसेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी प्रोजेक्ट इंजिनिअर प्रशांत वैद्य, सरव्यवस्थापक किशनकुमार, इलेक्ट्रीकल इनचार्ज प्रकाश डुबल, नियंत्रण कक्ष अधिकारी राजेश अस्थाना, सिध्दार्थ भस्मे, कोल्हापूर विमानतळ संचालक अनिल शिंदे, रावसाहेब माने, समीर शेठ उपस्थित होते.