मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 28 जून) अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे. त्यानंतर आज लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा जीआर म्हणजेच शासन आदेश काढण्यात आला असल्याची घोषणा केली.पण अजून  सभागृहाची मंजूरी मिळाली नाही. तरही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून त्याचा जीआर दाखवणे हा हक्कभंग असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन विधीमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रीया डावलून मंत्रिमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सरकारने शासन निर्णय काढला. हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे, असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय

तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जीआर काढून या सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. कारण जर अर्थसंकल्पाला अजून मान्यताच नाही तरी देखील हा जीआर काढला गेला. एकमेकातील कुरघोडी आणि राजकारणापायी हा घाईगडबडीत काढलेला शासन निर्णय आहे. त्यानंतर अध्यक्ष महोदयांनी देखील हा शासन निर्णय वाचून दाखविला. त्यांनी देखील कायदेशीर बाबींची शहानिशा करणे आवश्यक होते. या घोषणेचे श्रेय अर्थमंत्र्यांना घेवू द्यायचे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही कुरघोडी केली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.