नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने मनगटाच्या दुखापतीनंतरही जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत तिने एकूण २०० किलो वजन उचलले.

टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती चानूने ४९ किलो गटात स्नॅचमध्ये ८७ किलो आणि ‘क्लीन अँड जर्क’मध्ये ११३ किलो वजन उचलले. यादरम्यान चीनची वेटलिफ्टर जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. दुसरीकडे आणखी एक चिनी वेटलिफ्टर हौ झिहुईने १९८ किलो वजन उचलून पोडियमवर मजल मारली. झिहुई ही ४९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते.

कोलंबियातील बोगोटा येथे आयोजित वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास सोपा नव्हता. ती दुखापतीचा सामना करत होती; पण ती मनाने खंबीर होती. तिने ११३ किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये रौप्यपदक जिंकले. मात्र, स्नॅचच्या प्रयत्नादरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला; मात्र असे असतानाही तिने शानदार बचाव केला. अशा परिस्थितीत तिने शरीरावर ताबा ठेवत गुडघ्याचा आणि खालच्या शरीराचा आधार घेतला. मीराबाईने स्नॅचमध्ये किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण २०० किलो वजन उचलले.