कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. या विद्यापीठाच्या कोल्हापुरात होत असलेल्या विभागीय केंद्रामुळे कोल्हापूरसह सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांना तत्पर सेवा- सुविधा मिळतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.


पुढे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शेंडा पार्कच्या १,१०० बेडच्या हॉस्पिटलच्या भूमिपूजनाबरोबरच या विभागीय केंद्राचे भूमिपूजनही संपन्न करू. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राच्या उद्घाटन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.


मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये ६० वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या सर्वच महाविद्यालयांच्या प्रशासकीय कामासाठी त्यांना नाशिक येथे ये- जा करावी लागत असे. कोल्हापूर विभागीय केंद्रामुळे सर्वांचा हा त्रास वाचेल. हे विभागीय केंद्र सर्व सुविधायुक्त आणि सुसज्ज होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.

चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा त्रास कमी होणार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यातील तीन एकर जागा या विभागीय केंद्रासाठी दिली. त्यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळेच अल्पावधीतच हे विभागीय केंद्र साकारत आहे. त्यांनी मनावर घेतल्यामुळेच नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे पूर्ण क्षमतेचे विभागीय केंद्र इतक्या तत्परतेने कोल्हापुरात साकारत आहे. यामुळे या चार जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचा त्रास कमी होणार आहे.