पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50 व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, मुंबई येथे 1997 आणि 2006 मध्ये पुण्याला हे प्रदर्शन भरविण्याची संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास यावेळी राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.