कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील सातार्डे गावातील गट नं. ८५९/२०० मध्ये गेल्या काही वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचे अवैध्य उत्खन्नन सुरु आहे. विशेष म्हणजे हि जमीन वर्ग २ प्रकारात मोडते. ‘लाईव्ह मराठी’ने प्रत्यक्ष उत्खन्ननाच्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे. यावर संबधित विभाग ठोस कारवाई का करत नाहीय असा प्रश्न निर्माण होत आहे. 

पन्हाळ्यातील सातार्डे या गावी स्वातंत्र्य सैनिक पांडूरंग लक्ष्मण हराळे यांना कसण्यासाठी शासनाने साडेसहा एकर जमिन अटीशर्तींच्या अधीन राहून दिली होती. सदरच्या जमिनीचा उपयोग शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी करण्याचे बंधन शासनाने घालून दिले असताना संबंधीतांनी ही जमीन बेकायदेशीरपणे नाममात्र रकमेच्या मोबदल्यात उत्खन्ननासाठी दिली. काही वर्षांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूल विभागाने त्या जागेचा पंचनामा करुन या जागेवर एक कोटी सहा लाख ४७ हजार ६०० रुपयांचा बोजा सदरच्या जमिनीवर चढवला आणि या खाणी सील केल्या.

मात्र, निर्ढावलेल्या उत्खन्नन माफियांनी महसूलची पाठ मागे फिरताच पुन्हा उत्खन्ननास सुरुवात केली. ही जागा ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या वाघझई देवस्थान मंदिराकडे जाणाऱ्या घाट रस्त्याला लागून आहे. हा घाट रस्ता अतिशय धोकादायकरीत्या खोदला गेला आहे. या ठिकाणी महावितरणचे खांब देखील उत्खन्नापासून वाचलेले नाहीत. खांबाच्या आजूबाजूला अगदी काठोकाठ खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही वेळी हे खांब कोसळण्याची दाट शक्यता असून मोठी दुर्घटना होऊ शकते.

बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या या प्रकाराकडे शासनाने फक्त बोजा चढवून समाधान मानले आहे. यानंतरही अजूनही सदर ठिकाणी उत्खनन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यावर पन्हाळा तहसीलदार यांनी तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. तसेच शासनाने जो कोट्यावधीचा बोजा लावला आहे तो कधी वसूल करणार असा प्रश्नही निर्माण झाला आहे. जर यावर योग्य वेळेत कारवाई झाली नाही तर भविष्यात माळीण दुर्घटना किंवा मोठा भूस्खलनाचा धोका निर्माण होणार आहे. हे मात्र निश्चित..!