पंढरपूर प्रतिनिधी

दुधामध्ये घातक केमिकल करणाऱ्या टोळीवर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १४ केमिकल जप्त करण्यात आले आहे. हे केमिकल फुलचिंचोली येथील एका डेअरीमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पुढे येत आहे. दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी या केमिकलचा वापर केला जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस हवालदार नवनाथ सावंत हे २६ जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत रात्रीची गस्त घालत होते . मध्यरात्रीच्या एकच्या सुमारास टाटा विस्टा, अशोक लेलँड अशी दोन संशयित वाहने नवीन वाखरी-गुरसाळे बायपास फ्लाई ओव्हर लाईव्ह पुलाजवळ दिसून आली. त्यामधील टेम्पोमध्ये दूध भरण्याचे रिकामे १९ कॅन व दुसऱ्या अशोक लेलँड टेम्पोमध्ये निळ्या रंगाचे १४ कॅन त्यामध्ये पांढऱ्या रंगाचे लिक्विड भरलेले दिसून आले. तिथे उपस्थित असणाऱ्या तिघांची चौकशी केली असता या त्यामध्ये दुधामध्ये भेसळ करण्याचे केमिकल असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे (३० वर्षे, राहणार रो हाऊस क्रमांक ३८ वृंदावन सोसायटी टाकळी ) परमेश्वर सिद्धेश्वर काळे ( वय ४० वर्षे रा. काळे मळा) आणि गणेश हनुमंत गाडेकर (वय २५ वर्षे, रा. सुरेंद्र कुलकर्णी यांच्या घरी गणेश नर्सरी जवळ टाकळी रोड पद्मावती पंढरपूर) या तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत तिघांकडे दुधाचे रिकामे कॅन आणि प्लास्टिकमध्ये असलेले पांढरे लिक्विड याबाबत सखोल चौकशी केली असता सदरचे लिक्विड सुमित मेहता (रा. वडगाव निंबाळकर तालुका बारामती) यांचे कडून दुधात भेसळ करण्याकरता आणलेले आहे असे सांगितले. सदरबाबत अन्न व औषधी प्रशासन विभाग यांना कळविण्यात आले असून या विभागाचे पथक पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे असता नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले . अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली सुरू असून या टोळीवर मौक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे .