मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या शहर आणि गावांमध्ये कमी आहे. अशा ठिकाणच्या व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज (बुधवार) सकाळी भेट घेतली असल्याचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.  

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले की, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसमोर व्यवसाय बंद असल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी उपमुख्यमंत्र्यांच्यापुढे मांडल्या. जिल्ह्याच्या सर्व शहरांमधील तसेच ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय सातत्याने बंद राहत आहेत. व्यापाऱ्यांचे व्यवसाय शासनाच्या अटी व शर्तीसह सुरू करण्यासाठी आपण प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी विनंती केली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगितले.

तसेच उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना व्यापाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तातडीने आदेश दिले आहेत. रुग्णबाधित होण्याचे प्रमाण ज्या ठिकाणी कमी असेल अशा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून लवकरच आदेश पारित होतील असेही त्यांनी सांगितले.