नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले असताना आता सरकारी क्षेत्रातून आशादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेकडून १ लाख ४० हजार पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून तीन टप्प्यांत ही भरती प्रक्रिया पार पडेल. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ होईल. रेल्वे विभागाने ११ डिसेंबरला प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार तब्बल सव्वा लाख पदांसाठी २.४४ लाख उमेदवार इच्छूक आहेत. त्यामुळे रेल्वेतील नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड स्पर्धा असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. १५ ते १८ डिसेंबर या कालावधीत उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज पदांसाठी २८ डिसेंबर ते मार्च २०२१ या काळात परीक्षा होतील. तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल ते जून २०२१ असा असेल.

आयसोलेटेड आणि मिनिस्टिअरल श्रेणीसाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून परीक्षेची वेळ, तारीख आणि ठिकाणाची माहिती देण्यात येईल. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर परीक्षेच्या चार दिवस आधी ई-कॉल लेटर उपलब्ध होईल. त्यापुढील प्रक्रियेची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध होणार आहे. जेणेकरून उमेदवार सहजपणे याठिकाणी पोहोचू शकतील. मात्र, काही उमेदवारांना दुसऱ्या राज्यातही परीक्षा केंद्र मिळू शकते. त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या जातील. यासाठी प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांना सहकार्य करण्याची विनंती रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.