कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे. त्यामुळे या नाकर्ते सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने आज कोल्हापूर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे व ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश  आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी ओ.बी.सी.समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ओ.बी.सी.मोर्च्याच्यावतीने अपर चिटणीस जिल्हाधिकारी कार्यालय संतोष कणसे यांना निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओ.बी.सी.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या ओ.बी.सी.समाजाच्या आरक्षण रद्द निर्णयाबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिनांक १२ डिसेंबर, २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार ओ.बी.सी.समाजासाठी “लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा.” या आदेशांना जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दहा ते बारा वेळा तारीख देऊन देखील आदेशांची पूर्तता या सरकार कडून होत नाही. विरोधी पक्ष म्हणून देवेंद्रजी व भाजपा ओ.बी.सी मोर्चाने दिलेल्या निवेदन, पत्रावर ठाकरे सरकार कडून साधे उत्तर देखील नाही. यातून हे सरकार ओ.बी.सी.समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील नाही हेच दिसून येत आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी मोठा संघर्ष उभारून ओ.बी.सी.समाजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. या सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता न्यायालयात न केल्यामुळे हे आरक्षण रखडले आहे. तीन तिघाडी-बिघाडी सरकार हे निद्रिस्त अवस्थेत आहे. त्यामुळे ओ.बी.सी.समाजाच्या या लढ्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी.समाजा सोबत कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओ.बी.सी.महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, दिग्विजय कालेकर आदींसह भाजपा ओ.बी.सी.मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.