कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळामध्ये पोलिसांचे खूप मोलाचे योगदान आहे. त्यामुळे ‘एकटी’ संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बेघर निवाऱ्यामार्फत पोलिसांना मास्क देण्यात आले. पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मास्क आणि आभाराचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहेत.

यात जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी या पोलीस स्टेशनना एकटी संस्थेतर्फे मास्क देण्यात आले. महानगरपालिका आणि एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २ महिलांचे आणि २ पुरुषांचे बेघर निवारे कार्यान्वित आहेत. कोविड१९ च्या काळात निवाऱ्यातील महिलांना मास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महिलांनी ५ हजार मास्क तयार केले. हे मास्क विक्रीसाठी काही मेडिकल आणि इतर ठिकाणी देण्यात आले आहेत.

सध्या कोरोनाकाळामध्ये बेघर निवाऱ्यामध्ये आरोग्य तपासणी आणि कोविड तपासणी न करता तसेच मानसिक आजारी बेघर लाभार्थ्यांना निवाऱ्यात दाखल करून घेण्याची जबरदस्ती केली जाते. इतर लाभार्थ्यांचा विचार करता हे खूप धोकादायक आहे. इतर लाभार्थ्यांना कोविडची लागण होऊ शकते. मानसिक आजारी बेघरांना मेंटल हेल्थ ऍक्ट – २०१७ नुसार एकटी संस्था अशा लाभार्त्यांना सांभाळण्यास सक्षम नाही. अशा लाभार्थ्यांना सांभाळताना संस्थेला खूप अडचणी येत आहेत. या संदर्भात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे सर्व पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे ही बाब सांगण्यात आली.

यावेळी एकटी संस्थेच्या शिष्टमंडळामध्ये व्यवस्थापक पुष्पा कांबळे, रोहित डिगे, अनुप्रिया कदम आदी उपस्थित होते.