कोल्हापूर (प्रतिनिधी) : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. घरोघरी कुळाचाराप्रमाणे आणि देवीच्या देवळामध्ये भक्ती पूर्व घटस्थापना केली जाते. काही ठिकाणी प्रत्यक्ष घटाची स्थापना असते तर काही ठिकाणी अष्टभुजा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे घटस्थापनेच्या पुजेचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगभग सुरु झाली आहे.
नवरात्रानिमित्त महाराष्ट्रातली साडे तीन शक्तीपीठ सजले आहे. नवरात्रात लाखो भाविक साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेतात. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तश्रृंगी आणि माहुरची रेणुकामाता ही साडे तीन शक्तीपीठं आहेत. पण, यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीर मंदिरे बंदच राहणार आहेत. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी सोशल मीडिया आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेदिवशी लागणारे मातीची लोटे, फळे, फुले या साहित्यांची विक्री कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाद्वार रोडवरील बाजारपेठा या साहित्यांची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे फुलली आहेत.