कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांची मात्र कोंडी झाली आहे. या मतदारसंघातील ‘वंचित’च्या उमेदवारीने शेट्टी यांची कोंडी झाली आहे; तर सरुडकरांच्या उमेदवारीने निवडणुकीतच रंगत आली आहे.

महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ठाकरे गटाकडून त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती. ‘मशाल’वर लढल्यास ‘स्वाभिमानी’चं काय करायचे? पुन्हा पक्षीय बंधने नकोत या मानसिकतेतून शेट्टी आघाडीपासून दुरावत गेले. यानंतर उद्धव ठाकरेंनी सरुडकरांची थेट उमेदवारीच जाहीर केली आणि शेवटी या मतदारसंघात ठाकरे गटाच्या रूपाने चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

२०१९ ची लढत आणि आजची परिस्थिती –
२०१९ च्या निवडणुकीत माने विरुद्ध शेट्टी, अशी दुरंगी लढत झाली. पर्याय नसल्याने मानेंच्या मागे भाजपची ताकद उभी राहिली. मराठा कार्ड, तरुण उमेदवार, भाषण कौशल्य आणि महायुतीची ताकद या जोरावर माने विजयी झाले. पण, आता इचलकरंजीतून भाजपबरोबर असलेल्या आवाडे गटानेच मानेंच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे. यातून भाजपमधील गटबाजी उघड झाली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासमोर विधानसभेशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे ते वगळता अन्य कोणी मानेंसाठी झटताना दिसत नाही. त्यातून पाच वर्षांतील कामांमुळे मानेंविषयी नाराजी होतीच, ती आता उघडपणे व्यक्त होत आहे.

ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह घराघरांत पोहाेचवणे महत्त्वाआचे आहे. त्यासाठी लोकसभा हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यातून सरुडकरांना रिंगणात उतरले आहे. गेल्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असलेल्या शिरोळमधून शेट्टींना अवघे सात हजारांचे मताधिक्य मिळाले होते, यावरून त्यांच्याविषयी नाराजी दिसते. ऊसदरावरून शेट्टींविरोधात कारखानदार आहेत. सरुडकर हे थेट कारखानदार नाहीत. त्यामुळे कारखानदार शेट्टींचा ‘कार्यक्रम’ करण्यासाठी सरुडकर यांना साथ देण्याची शक्यता आहे.