मुरगूड ( प्रतिनिधी ) : साखर कारखान्याकडून वजन मापा मधील काटामारीतून बळीराजाची होत असलेल्या लुटीच्या पापाची स्पष्ट कबुली देऊन ऊस उत्पादकांचा उसना कळवळा(पुतना मावशीचे प्रेम) दाखवणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे, बिनचूक ऊस वजनासाठी ऑनलाइन काट्याची यंत्रणा उभी करून दोषी कारखान्यावर फौजदारी कारवाई करून साखर सम्राटांची मस्ती उतरण्याची हिम्मत दाखवण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
याबाबत आपल्या न्याय – हक्कासाठी शेतकऱ्यांची एकीची ताकद दाखवून, लुटारू साखर सम्राटांच्या पाठीशी घालणाऱ्या जुलमी शासनाच्या पाठीवर आसूड ओढण्यासाठी गुरुवार दिनांक 16 रोजी जयसिंगपूर मधील ऊस परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन माजी खासदार शेट्टी यांनी शेतकरी मेळाव्यामध्ये केले. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक, चिकोत्रा जन आंदोलनाचे ॲड. दयानंद पाटील – नंद्याळकर होते.
शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र गड्ड्यांणवर म्हणाले की स्वाभिमानीने संघर्षातून मिळवलेल्या उसाच्या एक रकमी एफ.आर. पी.विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे महापाप राज्य सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकार अनेक शेतकरी विरोधी कायदे करत आहे . यासाठी स्वाभिमानी संघटनेला सातत्याने शेतकऱ्या हितासाठी रस्त्यावरील व कोर्टाची लढाई करावी लागत आहे. याचा जाब विचारण्या साठी ऊस परिषदेस हजर राहावे.
यावेळी शिवाजी पाटील, पांडुरंग चौगुले, शिवाजी कासोटे, रानोजी गोधडे, नितेश कोगनोळी, उत्तम बांबरे, हिंदुराव अस्वले, महादेव कामते, उत्तम आवळेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आण्णासाहेब आडेकर, दत्तात्रेय कांबळे, बाळासो कुणकेकर, रावसो आंबीलढोके, आनंदा फगरे, आनंदा येजरे, राजू शिंदे, संजय खेबुडे, गणेश पाटील, उदय पाटील, बाबुराव पाटील, रणजीत खोत अमोल मेटकर यांच्यासह पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.