कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे फुटबॉलवरील प्रेम मी पाहिले आहे. प्रत्येक खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. आण्णांचा वारसा आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रातील जाधव कुटुंबाचे योगदान मोठे आहे असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर शहरातील सोळा वरिष्ठ (सीनियर) फुटबॉल संघातील खेळाडूंना जाधव इंडस्ट्रीज, एफसी कोल्हापूर सिटी व जयश्री चंद्रकांत जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल किटचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.

शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉलला राजाश्रय बरोबर लोकाश्रय मिळाला आहे. लोकाश्रयमध्ये दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे नाव अग्रभागी आहे. फुटबॉलमध्ये त्यांची उणीव सातत्याने जाणवते, हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.

आ. सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉल आणि क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, यासाठी दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांची नेहमी धडपड होती. प्रत्येक फुटबॉल संघाचे स्वतंत्र सराव मैदान असावे यासाठी ते प्रयत्नशील होते. कोल्हापुरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रस्ताव आण्णांनी तयार करून घेतले आणि निधीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करत होते. फुटबॉलच्या माध्यमातून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आण्णांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे.

आ. जयश्री जाधव म्हणाल्या, फुटबॉल म्हणजे अण्णांचा जीव की प्राण. फुटबॉल हा शब्द जरी कानावर पडला तरी आता अण्णांच्या आठवणीने डोळे पाणावतात. आण्णा गेले तेव्हा अनेकांनी कोल्हापूरचा फुटबॉल पोरका झाला अशा भावना व्यक्त केल्या होत्या. पण कोल्हापूरचा फुटबॉल कधीही पोरका होणार नाही. जाधव कुटूंबीय कायमपणे फुटबॉल संघ व खेळाडूच्या पाठिशी खंबीरपणे राहणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव सत्यजित जाधव यांनी, आण्णा खेळाडू होते. त्यांनी सर्वच खेळांना प्रोत्सहन दिले. क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले पाहिजे, यासाठी आण्णा सदैव प्रयत्नशिल होते. आण्णांचे हे काम पुढे नेण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे सांगितले.

यावेळी पाटाकडील तालीम मंडळ-अ, शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ-अ, दिलबहार तालीम मंडळ-अ, संयुक्त जुना बुधवार पेठ, संध्यामठ तरुण मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब-अ, झुंजार क्लब, पाटाकडील तालीम मंडळ- ब, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, बीजीएम स्पोर्टस्, वेताळमळ तालीम मंडळ-अ, वर्षा विश्वास तरुण मंडळ, सोल्जर स्पोर्ट्स या सोळा संघांना व रेफ्री असोसिएशनला फुटबॉल किटचे वितरण करण्यात आले.

यावेली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल मोदी, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, प्रेमला जाधव आदी उपस्थित होते.