जोतिबा (विक्रम चौगले) : दख्खनचा राजा जोतिबा मालिकेची उत्सुकता असंख्य भाविक तसेच ग्रामस्थांना लागलेली आहे. ही मालिका अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे कोठारे व्हिजन यांच्यातर्फे सदर करण्यात येणार आहे. या मालिकेच्या संदर्भात काही दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांवर काही आक्षेपार्ह पोस्ट, चर्चांचे निरसन करण्यासाठी महेश कोठारे आणि त्यांची टीमने जोतिबा डोंगरावरच्या ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या भेटीला येऊन त्यांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या.
‘या मालिकेतील दाखवण्यात येणारी दृश्ये पूर्णतः अभ्यासपूर्वक आणि श्री केदारविजय ग्रंथावर आधारीत असतील आणि आमचे लेखक प्रत्यक्ष ग्रामस्थ,पुजारी, अभ्यासक यांच्याशी चर्चा करून सर्व कथा लेखन केले जाईल, तसेच अजून ज्यांना ही मालिका करावयाची आहे, त्यांना माझा विरोध नसून माझा पूर्ण पाठींबा राहील’, असे प्रतिपादन कोठारे यांनी केले. यावेळी त्यांनी ही मालिका सगळ्यांना आवडेल अशी ग्वाही दिली.
महेश कोठारेंच्या ग्वाहीनंतर ग्रामस्थांच्या वतीने या मालिकेला पूर्ण पाठींबा जाहीर करण्यात आला. पण कोणत्याही प्रकारचे चुकीचे कथानक दाखवण्यात येऊ नये, अन्यथा ग्रामस्थ व पुजारी यांच्यातून या मालिकेला विरोध केला जाईल, असे वक्तव्य ग्रामस्थ आणि पुजारी यांनी केले.