इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे पेट्रोलपंपावर कमी पेट्रोल देवून ग्राहकांची लूट करत असल्याचा गंभीर प्रकार आज (गुरुवार) सतेज फायटरने उघडकीस आणला. शहरातील जयहिंद मंडळासमोरील असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार उघडीस आला. यावेळी हा प्रकार वाहनधारकांच्या  लक्षात आल्यानंतर त्यांनी पेट्रोलपंपाला घेराव घातला आहे.

या पंपावर एक लिटरच्या मापकातून केवळ ७५० मिली पेट्रोल  वाहनधारकांना दिले जात आहे. पेट्रोल दरवाढीच्या काळात दिवसभर टेस्टिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केल्याचा हा प्रकार घडल्याने नागरिक अधिकच संतापले आहेत. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले असून पेट्रोल देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळच्या सत्रात पेट्रोलपंप सुरू होण्यापूर्वी टेस्टिंगसाठी या मापकातून एकदाच वाहनधारकांना पेट्रोल दिले जाते. एक लिटरच्या मापकातून ७५० मिली पेट्रोल देण्याचा हा प्रकार दिवसभर या पेट्रोलपंपावर सुरुच होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक वाहनधारक पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याने एक लिटर मापकातून पेट्रोल देण्याची मागणी केली.

मात्र, मापकात एक लिटर ऐवजी ७५० मिली पेट्रोल आढळून आले. त्यांनतर वाहनधारकाने याबाबत जाब विचारला. अनेकवेळा हा प्रकार अनुभवल्याचे वाहनधारकांनी पोलिसांना सांगितले. पेट्रोल दरवाढीच्या काळात हा प्रकार घडल्याने वाहनधारक चांगलेच संतापले होते.