मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी आज (मंगळवार) झाली. यामध्ये भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार  चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत,  तर अकोल्यामधून भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे.

विधान परिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र,  नागपूर आणि अकोला या जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यामध्ये महाविकास  आघाडीची पीछेहाट झाली आहे. तर भाजपने जोरदार मुंसडी मारली आहे.

नागपुरात एकूण ५४९ मतं वैध ठरली. विजय मिळवण्यासाठी २७५ मतं मिळवणं आवश्यक होते. यात भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना एकूण ३६२ मतं मिळाली. तर  रवींद्र भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे. तर काँग्रेसचे उमेदवार असलेले मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली आहेत. नागपुरात काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणावर फुटल्याचं सांगितले जात आहे.