कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचे सेवा केंद्र ठरावे यासाठी स्व. आमदार चंद्रकांत जाधव शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक घटकाची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी हे कार्यालय कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारच्या ई-श्रम कार्डची  मोफत नोंदणी जनसंपर्क कार्यालयात सुरू केली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. जाधव यांच्या पत्नी जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले.

जयश्री जाधव म्हणाल्या, कार्यालयातून सध्या संजय गांधी निराधार योजना, वैद्यकीय मदत कक्षासह नागरिकांची सर्व प्रकारची कामे सुरू आहेत. आ. जाधव यांचा आदर्श व तत्त्वाने आमचे सामाजिक कार्य सुरू आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्डमुळे पंतप्रधान श्रमिक योगी धन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आणि पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ तसेच अपघाती विम्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या कार्डची नोंदणी करावी, असे आवाहन जयश्री जाधव यांनी केले.

यावेळी सत्यजित जाधव, योगेश कुलकर्णी, संपत चव्हाण, दिपक चोरगे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल, शिवाजी जाधव, श्रीकांत माने, संभाजी देवणे आदी उपस्थित होते.