कोल्हापूरची (प्रतिनिधी) : राजारामपुरी आठवी गल्ली येथील अपार्टमेंट मधील बंद फ्लॅट फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अमित यशवंत रसाळ (वय ३६, रा. राजारामपुरी आठवी गल्ली) यांनी या चोरट्याच्या विरोधात आज (सोमवार) राजारामपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, रुक्मिणीनगर येथील अमित रसाळ हे गेल्या काही महिन्यांपासून राजारामपुरी आठव्या गल्लीतील दिनकर अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहतात. ते घरगुती कामानिमित्त रविवारी बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटून कपाट फोडून त्यातील पाच तोळ्याचे गंठण, सोन्याचे टॉप्स, चांदीचे ब्रेसलेट, पैंजण आणि पंधरा हजारांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
अमित रसाळ हे घरी आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी अमित रसाळ यांनी चोरट्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.