कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाडमध्ये स्वामी समर्थ कॉलनीमधील एका माजी सैनिकाच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ४ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १५ ते १८ मे या कालावधीत घडली आहे. कुरुंदवाड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वामी समर्थ कॉलनीत राहणारे माजी सैनिक सुभाष शंकर चव्हाण यांच्या बंद घराला चोरट्याने लक्ष्य केले. १५ ते १८ मे रोजी रात्रीच्या वेळेस चोरट्याने त्यांच्या घराचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाटाचे सेफ्टी लॉक तोडून लॉकरमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्याचा एक नेकलेस, ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक असलेले मनी मंगळसूत्र आणि ५०० रुपयांच्या ५० नोटा असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी.पवार करत आहेत.