कोल्हापूर (प्रतिनिधी) : भविष्यात ‘कोजिमाशि’च्या कर्जाचा व्याज दर एक अंकी करण्याचा निर्णय घेऊ व सर्व सभासदांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना सुरु करु, असा मानस व्यक्त करून विरोधी आघाडीच्या नेत्यांनी संस्थेच्या कारभारावर बोलावे. विनाकारण संस्थेची बदनामी करणारे खोटे आरोप करू नयेत, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी विरोधकांना दिला.

कोजिमाशि पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील होते. या निवडणुकीतून माघार घेतलेले जनार्दन गुरव, संजय रोडे, टी. डी. पाटील, सुभाष बोरगे, दीपक साठे आदींचा शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दत्ता पाटील म्हणाले, संस्थेच्या ठेवी ३० कोटीवरून ५१८ कोटीवर संस्थेत जमा झाल्या आहेत. यावरून संस्थेचा चढता आलेख आणि संस्थेची विश्वासहर्ता जनमानसात वाढली आहे, हे सिध्द होते. ज्यांना मुख्याध्यापक संघात दादा लाड यांच्यामुळे प्रवेश मिळाला, त्यांनी कोजिमाशिच्या निवडणुकीत दादांना पाठबळ देऊन मागील पैरा फेडण्यासाठी व समर्थ साथ देण्याची वेळ आली आहे.

मेळाव्यास चेअरमन बाळ डेळेकर, व्हा. चेअरमन सुभाष पाटील, आनंदराव इंगवले, शरद पाटील, मोहन कोलते, गजानन चव्हाण, के. ए. पाटील, एस. एस. खोराटे, बी. टी. पाटील, दत्ता शेळके तसेच शाहूवाडी तालुक्यातील सभासद उपस्थित होते. विजय कांबळे यांनी आभार मानले.