कोल्हापूर ( प्रतिनिधी ): केडीसीसी बँकेने पिककर्ज वसुलीची परंपरा कायम राखली आहे. ३० जून २०२४ अखेर पीककर्ज वसुली ९० टक्क्यांवर आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण पतपुरवठ्यामध्ये ८० टक्के वाटा एकट्या केडीसीसी बँकेचा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील एकूण १९०६ विकास संस्थांच्या माध्यमातून दोन लाख, ५३ हजार शेतकऱ्यांना गेल्यावर्षी म्हणजेच सन २०२३-२४ या पीक हंगामामध्ये ३० जून २०२४ अखेर २५३७ कोटी वसूलपात्र पीककर्ज रकमेपोटी एकूण २२८३ कोटी पीककर्ज वसूल झाले.

याबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे म्हणाले, गेल्या वर्षीपेक्षा पीक कर्ज वसुलीमध्ये वाढ झाली आहे. ही पीककर्ज वसुली ९५ टक्क्यांपर्यंत झाली असती. दरम्यान; गडहिंग्लज आणि हातकणंगले हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले. तसेच; जिल्ह्यामध्ये अपात्र कर्जमाफीमधील संस्था यामुळे ही वसुलीची टक्केवारी कमी झाली.

असे असून देखील शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या यांनी बँकेला वसुलीसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच; बँकेच्या संचालक मंडळांनेही मे व जूनमध्ये आपापल्या तालुक्यातील सेवा संस्थांच्या आढावा सभा घेऊन वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यामुळे या पिक हंगामातसुद्धा बँकेची चांगल्या वसुलीची परंपरा कायम राहिली.

त्यामुळे; महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष हसनसाहेब मुश्रीफ यांनी शेतकरी, विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, सचिव, साखर कारखाने, सर्व बाजार समित्या, बँकेचे कर्मचारी व अधिकारी, संचालक मंडळ सदस्य यांचे आभार व्यक्त केले.