बेंगलोर ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सुरु आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात बिनसल्याची चर्चा ही आहे. या चर्चेला गुरुवारी आणखी बळ मिळाले. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपण पूर्ण पाच वर्षे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर राहणार असल्याचे म्हटले आहे.


या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सत्ताधारी काँग्रेसमधील एका गटाने नेतृत्व बदलाची हाक दिल्यानंतर ते म्हणाले. मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षांतर्गत वारंवार होत असलेल्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्याबाबत सिद्धरामय्या यांना विचारले असता ते म्हणाले, ‘कोणाची दिशाभूल करणारी विधाने केली आहेत ? कुणी फालतू बोलत असेल तर त्याला महत्त्व का देता ?


डी.के. शिवकुमार यांच्याशिवाय कर्नाटकात आणखी दोन मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आहे. यावर सिद्धरामय्या म्हणाले, ‘हे सर्व हायकमांडने ठरवले आहे. काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष नसून राष्ट्रीय पक्ष आहे. हायकमांडशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकत नाही. मुख्यमंत्री म्हणून मी किंवा आमदार सरकार बदलू शकत नाही. आमच्याकडे हायकमांड आहे, तो निर्णय घेईल असे ही ते म्हणाले.