कळे ( प्रतिनिधी ) कळे ( ता. पन्हाळा)  येथे महेश माळवदे या पोलिस हावलदाराने एका व्यक्तीचे प्राण वाचविले. ही व्यक्ती कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर कळे पोलीस ठाण्याच्या दारातच जोराचा ब्रेन स्ट्रोक येऊन रस्त्यावर कोसळली होती. शिवाजी रखमाजी कांबळे (वय 35) रा.गलगले ( ता.कागल ) हे पन्हाळा तालुक्यातील घरपण या गावी 14 एप्रिल रोजी सासरवाडीला रात्रीअकराच्या सुमारास कळे कॅन्टीन वरून चालत निघाले  होते. दरम्यान ते कोल्हापूर गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर कळे पोलिस ठाण्याच्या दारातच चक्कर येऊन कोसळले.

ही गोष्ट ड्युटी संपवून घरी निघालेले कळे पोलीस ठाण्याचे पो.कॉ. विजय इंगळे यांच्या लक्षात आली. त्यांनी ही गोष्ट ऑन ड्युटी असणारे पोलीस हवालदार महेश माळवदे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी त्वरित कांबळे यांना रस्त्यावरून बाजूला घेतले. त्यांचे तोंड, हात-पाय वाकडे झाले होते. ते पूर्णपणे बेशुद्ध झाले होते. माळवदे यांनी कांबळे यांच्या छातीवर हळुवार मसाज केले. तोंडातून थोडा फेसही आला होता. तो आपल्या हात रुमालाने पुसला.

गुदमरू नये म्हणून माळवदे यांनी कांबळे यांच्या शर्टची बटने काढली. जेणेकरून त्यांना श्वास घेणे त्रासाचे होऊ नये. दरम्यान माळवदे यांनी 108 ॲम्बुलन्सला फोन करून ताबडतोब येण्यास सांगितले. कांबळे यांच्या फोन मध्ये असलेल्या मोबाईल नंबर वरून त्यांचे  सासऱे वसंत माळगे यांच्या घरी संपर्क केला. मेहुणा अक्षय माळगे लगेचच घटनास्थळी आला.ॲम्बुलन्सही  घटनास्थळी आली. डॉ.भास्कर वंजारे यांनी तपासणी करून कांबळे यांना जोराचा ब्रेन स्ट्रोक  आला असल्याची सांगितले व त्यांना त्वरित सी.पी.आर.ला हलविले. 

दि.15 एप्रिल रोजी कांबळे यांच्या तबेतीची चौकशी केली असता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असून त्यांचा धोका पूर्णपणे टाळला असल्याचे सांगण्यात आले. कळे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश माळवदे यांनी प्रसंगावधनाने कांबळे यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे कळे परिसरात कौतुक होत आहे. या कामी पोलीस हावालदार सरदार भोसले,  होमगार्ड नाना पाटील, सुरेश खोत, यांनीही सहकार्य केले.