मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या वर्षी १ ऑक्टोबर २०२२  या दिवशी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर झालेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतात 5G नेटवर्क लाँच केल्याची अधिकृत घोषणा केली. 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करतं. त्यामुळे देशात 5G नेटवर्कची गरज भासू लागली होती. सध्या भारतातील मोजक्या शहरांमध्ये रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना 5G नेटवर्क देऊ केले आहे.

आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सचा कारभार हाती घेऊन२० वर्षं झाल्यानिमित्त रिलायन्सने 5G नेटवर्कबद्दल एक मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी घोषणा केली आहे की, २०२३ मध्ये देशातील प्रत्येक शहर आणि गावात जिओ 5G नेटवर्क सुविधा उपलब्ध होईल. आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीचे संस्थापक आणि त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या व्हर्च्युअल भाषणात ही माहिती दिली.