मुंबई (प्रतिनिधी) : हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विविध मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी देखील विरोधकांच्या प्रश्नांना तोडीस तोड उत्तर देत आहेत.

दिशा सालियान प्रकरण संसदेत चांगलेच गाजले. त्यानंतर जयंत पाटील यांनी असंसदीय शद्बाचा वापर केल्याने त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, विरोधकांकडून सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला होता; मात्र आता जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

जयंत पाटील यांच्या निलंबनावर शरद पवार नाराज आहेत. जयंत पाटलांचे निलंबन झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी थेट दिल्लीमधून अजित पवार यांना फोन करत आपली नाराजी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती; मात्र तसे न झाल्याने शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.