इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथील वरदविनायक बोट क्लबने महापूराच्या काळात सदैव सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात दिला आहे. या क्लबने अडचणीतून मार्ग काढत अनेकांचे प्राण वाचवले आहेत. यासाठी मदतीचा हात म्हणून या क्लबला जवाहर साखर कारखान्याच्यावतीने यांत्रिक बोट देण्यात आली असल्याचे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले. 

इचलकरंजीचा कबड्डी, खो-खो बरोबरच रोईंग क्रीडा प्रकारातही नावलौकिक होत आहे. शहरातील अनेक खेळाडूंनी यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धडक मारली आहे. वरदविनायक बोट क्लबच्या माध्यमातून इचलकरंजी रोईंग क्लबने नावलौकिक असाच उंचावत न्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बोट असोशिएशनचे अध्यक्ष तथा आ.  यांनी केले.

वरदविनायक बोट क्लबकडे ४० बोट असून इतक्या मोठ्या प्रमाणात बोटी असणारे इचलकरंजी एकमात्र शहर असेल. रोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी सराव करुन इचलकरंजीचे नाव अधिकाधिक उंचवावे. त्यासाठी त्यांना लागेल ती मदत दिली जाईल. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या खेळाडूस १ लाख रुपये, रौप्यपदक जिंकणार्‍यास ७५ हजार रुपये तर कांस्यपदक विजेत्यास ५० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल, असेही आ. आवाडे यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, बाळासाहेब जांभळे, संजय आरेकर, पै. अमृत भोसले, गणेश बरगाले, शशिकांत नेजे, संजय बेडक्याळे, तानाजी कोकितकर, नगरपरिषदेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख संजय कांबळे, डॉ. माळी, गजानन चव्हाण, रमेश सातपुते आदी उपस्थित होते.