परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते महादेव जानकर हे महायुतीत बंड करून शरद पवार गटाकडून माढा लोकसभेची उमेदवारी घेऊन निवडणूक लढण्याच्या तय्रीत होते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणकारांचे बंड थंड करत त्यांना परभणीतून उमेदवारी दिली. याठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यात थेट लढत होणार आहे. यातच संजय जाधव यांनी महादेव जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांनी प्रचाराद्म्यान बोलताना 26 एप्रिलनंतर महादेव जानकर हे रेल्वेस्थानकावर झोपतील. तर आमदार रत्नाकर गुट्टे हे तुरुंगात असतील, असं जाधव म्हणालेत. विशेष म्हणजे ज्या दिवशी परभणीत मोदींची सभा झाली, तेव्हाच माझा विजय झाला होता, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.

परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक डॉक्टर यांच्याशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना संजय जाधव म्हणाले की, 2024 सालची लोकसभा निवडणुकी वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. भाजपने बारामती आणि माढाची जागा वाचविण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमध्ये पाठवले आहे. जानकर यांना परभणीतून उमेदवारी देताना त्यांना एका विशिष्ट जातीचे लेबल लावून पाठवले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण करून लढत आहे, असा आरोप जाधव यांनी केला.

जानकर रेल्वे स्टेशनवर, तर गुट्टे तुरुंगात झोपणार
देशाच्या संविधानिक पदावर असलेले मोदी म्हणतात मी ओबीसी, फडणवीस म्हणतात आमचा डीएनए ओबीसी आहे. यांनीअसं म्हणल्यावर सर्वसामान्य इतर लोकांनी कुणाकडे बघायचे. अरे माझा विजय त्याच दिवशी झाला ज्या दिवशी मोदींची सभा परभणीत झाली, असंही संजय जाधव म्हणाले. तसंच 26 एप्रिल नंत एक जण रेल्वेस्टेशन तर एक जण तुरंगातमध्ये झोपणार असा टोलाही संजय जाधव यांनी महादेव जानकर आणि रत्नाकर गुट्टे यांना लगावला.

परभणीचे मोदी आम्हीच
या कार्यक्रमात व्यासपीठावर खासदार फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, विजय गव्हाणे विवेक नावंदर, यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. काही जण मोदी-मोदी करतात. पण त्यांना सांगेल की परभणीचा मोदी आम्हीच आहोत. उद्या तुमच्यावर काही वेळ आली तर आम्हीच तुमच्यासाठी धावून येणार आहोत. मोदी मदत करायला येणार नाहीत, हे लक्षात घ्यावे, असं ही जाधव परभणीतील जनतेला उद्देशून म्हणाले.