मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे नेते, खा. संजय राऊत आणि भाजपचे नेते, आ. आशिष शेलार यांची भेट झाल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिल्यानंतर या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. मात्र, अशी भेट झालीच नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील वादाच्या बातम्या आणि राज्यातील सत्तांतराच्या चर्चेमुळे या वृत्ताकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

खा. संजय राऊत आणि आ. आशीष शेलार यांची दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथे गुप्त भेट झाल्याची बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत आणि आ. आशिष शेलार हे दोघे मित्र असून ते वरचेवर भेटत असतात, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

या दोन नेत्यांची भेट ही राजकीय स्वरूपाची नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. आ. शेलार यांनी या भेटीचा इन्कार केला असला तरी चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांनी भेटीबाबत अस्पष्ट प्रतिक्रिया दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.