कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सर्व शिक्षकांची कोविड चाचणी आणि पूर्व तयारी करून टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय संस्थाचालक, पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात आज (शनिवार) संस्थाचालक, पदाधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक घेण्यात आली.

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. सर्व शिक्षकांची कोविड चाचणी पूर्ण झाल्याशिवाय आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांनी लेखी संमती दिल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत. यासाठी कालावधी लागणार असल्याने ७ डिसेंबर नंतर शाळा सुरु केल्या तरी त्यास संमती देण्यात आली. परंतु, त्यानंतर टप्याटप्याने योग्य ती खबरदारी आणि काळजी घेत, जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांनी सुरू कराव्यात, असा निर्णय आज घेण्यात आला. या परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.