रांची ( प्रतिनिधी ) झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरु आहे. यात मोठी रक्कम जप्त केली असल्याचं ही वृत्त आहे. यानंतर आता सोरेन यांना 5 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणात 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सोरेन यांना अटक केली होती.

दरम्यान, झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांनी आता नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विशेष न्यायालयाने हेमंत सोरेनला अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात त्यांनी रात्र काढली. हेमंतला कारागृहात कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते.

तुरुंग व्यवस्थापनाने हेमंत यांना पहिल्या रात्री जेवणात ब्रेड, दूध आणि बटाटा-कोबीची भाजी दिली. हेमंत यांना रात्री आठ वाजेपर्यंत दोनदा जेवायला सांगितले. त्यांनी नकार दिला. नंतर जेवण केले. कारागृहात पोहोचताच कैद्यांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू ही. त्यामुळे अनेक कैद्यांना हेमंत यांना भेटायचे होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव एकाही कैद्याला त्यांना भेटता आलेले नाही. आता ईडी पुन्हा जमीन घोटाळ्याबाबत त्यांची कडक चौकशी करणार आहे.