पंढरपूर (प्रतिनिधी) : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा नव्याने विकास करताना पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करुन विकास करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यात भाविकांची व मंदिराची सुरक्षा तसेच आपत्ती व्यवस्थापनतंर्गत गर्दी नियोजन याबाबतची पाहणी जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दर्शनासाठी योणाऱ्या भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, वारकऱ्यांच्या सर्व प्रथा, परंपराचे जतन करून  नव्याने विकास करण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या आणि मंदिरातील गर्दी लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनातंर्गत सुरक्षेच्या दृष्टीने नव्याने करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करुन आवश्यक सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी दिल्या. अपर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुरातन वास्तूचे जतन आणि संवर्धन करुन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा नव्याने विकास  करण्यात येणाऱ्या कामांची तसेच सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत माहिती दिली.

यावेळी  संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभा मंडप, दीपमाळ, मंदिरातील दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, बाजीराव पडसाळी आदी ठिकाणची पाहणी  जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी केली. त्यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मतराव जाधव, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मुख्यधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर आदी उपस्थित होते.