कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कृष्णा-पंचगंगा नद्याचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. शिरोळ तालुक्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर परिस्थितीसाठी (एनडीआरएफ) एक तुकडी दाखल झाली आहे. प्रशासक निखिल जाधव यांनी तुकडीचे निरीक्षक लोकेश रत्नपारखी व पथकातील जवानांची भेट घेत संगम घाट, दत्त मंदिर परिसराची पाहणी केली.

कृष्णा घाट येथे एनडीआरएफ पथकाच्या वतीने यांत्रिक बोटीद्वारे नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदी परिसरातील दिनकरराव यादव पूल व भारतीय जल आयोगाच्या केंद्रापर्यंत, तर शहरातील गोठणपूर, शिकलगार वाडा, भैरववाडी परिसरासह महापूर निर्माण होणाऱ्या भागाची पाहणी केली. पूर परिस्थिती उद्भवल्यास या ठिकाणी काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, या दृष्टिकोनातून आराखडा तयार करण्यात येणार आहे.

एनडीआरएफ टीम सोबत २ यांत्रिक बोटी, ४५ लाईफ जॅकेट,१५ लाईफ रिंग आदी बचाव कार्याच्या साहित्याची माहिती निरीक्षक प्रशांत चित्त, वीरेंद्र जयस्वाल, राजेंद्र सोले, राहुल नवथडे यांनी माहिती दिली. यावेळी प्रणाम शिंदे, योगेश गुरव, पूजा पाटील, आपत्ती व्यवस्थापनचे रौफ पटेल, राजेंद्र बेले आदी उपस्थित होते.