आजरा (प्रतिनिधी) : कोवाडे (ता.आजरा) येथील सातेरी सहकारी दूध संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातेरी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडवीत ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. या पॅनेलने १० जागा जिंकत सत्तांतर केले. तर विरोधी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीला बिनविरोध १ जागेवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीत सत्ताधारी विठ्ठल-रुक्मिणी आघाडीचे भटक्या विमुक्त जाती जमातीमधील राखीव मोहन गोंधळी तर सातेरी परिवर्तन आघाडीचे अनुसुचित जाती -जमातीचे रमेश कांबळे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस होती. मात्र, सातेरी परिवर्तन आघाडीने निवडणुकीतील सर्व १० जागा जिंकून एकतर्फी सत्ता प्रस्थापित केली.

सातेरी परिवर्तन आघाडीचे विजयी उमेदवार आणि पडलेली मते पुढील प्रमाणे – आनंदा घोळसे (७३), भास्कर देसाई (६७), अमर होडगे (६६), बाबू सुतार (६६), नामदेव सावंत (६२), महादेव मांगले (६१), आप्पा पोवार (५९), सरिता जगदाळे (६८), विमल भिऊगडे (६१) अशी मते पडली आहेत. विजयी उमेदवार व समर्थकानी फटाके फोडत गुलालाची उधळण केली.

सातेरी परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व सरपंच मनोहर जगदाळे, धनंजय सावंत,महादेव पोवार, मारुती देसाई अमृतराव हुंदळेकर,गणपती घोळसे रघुनाथ गुरव संतोष चौगुले, शंकर जकाते यांनी केले. तर विरोधी आघाडीचे नेतृत्व डी. वाय. देसाई, विनायक जकाते, सयाजी होरटे, विठोबा तांबेकर यांनी केले.