मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड-निपाणी रस्त्यावरील खा. संजय मंडलिक यांच्या बंगल्यासमोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निलगीरी वृक्षावरील घरट्यातून एका घारीचे पिल्लू खाली पडले. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. यावेळी इथून जाणाऱ्या ऋषिकेश साळोखे यांना ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी या पिल्लाला शिताफिने पकडत बॉक्समध्ये घालून पशूवैद्यकिय डॉक्टरांना दाखवत त्याच्यावर उपचार केले.

ऋषिकेश यांनी पिल्लाच्या उपचारानंतर वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांच्याकडे घेऊन आले. यानंतर सुर्यवंशी यांनी या घारीच्या पिल्लाचे संगोपन सुरु केले. या पिल्लाला दवापाणी देत त्याला मायेचा घास भरवला. सुरवातीला या लहान पिल्लाला उभेही रहाता येत नव्हते आणि काही खाताही येत नव्हते. यावेळी सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या  पिल्लाची चोच उघडून घास भरवत होते. पंधरा दिवसानंतर हळूहळू ते पिल्लू स्वतः खाण्याचा प्रयत्न करू लागले. या काळात त्याच्या अंगावरील पिसे खुप गळत होती. पण पंधरा दिवसानंतर त्याचे अंगावरील पिसांची गळती थांबून त्याच रुप पालटत जाऊन एका छोट्या सुंदर देखण्या आणि रुबाबदार घारीत त्याच रुपांतर झाले.

आता ते पिल्लू समोर अन्न स्वतः खाते आहे. खोलीत त्याला खुले सोडूल्यास ते उडण्याचा प्रयत्न करते आहे. चार आठ दिवसात त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले जाणार आहे. त्यामुळे कोणताही मोबदला न घेता प्रविण सुर्यवंशी हे मुरगूड आणि परिसरात काम करीत आहेत. सुर्यवंशी यांनी आजवर घुबड, साळुंखी, कबुतर, कावळा, चिमणी, पानकोंबडी, दयाळ, नाचरा, पिंगळा, लावा, खंड्या आदी पक्षांना जीवनदान दिले आहे.