कोल्हापूर (प्रतिनिधी) :  त्या व्यसनी तरुणाने दारुला पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि काळजासह अक्षरशः भाजून खाल्ले. आपल्या जन्मदात्या आईशी इतके राक्षसी कृत्य करणारा क्रूरकर्मा आहे. कोल्हापूरातील कावळा नाका परिसरात राहणारा सुनिल रामा कुचीकोरवी तर यल्लव्वा रामा कुचीकोरवी असे या दुर्देवी मातेचे नाव आहे. या कृत्याबद्दल सुनिल याला जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

कोल्हापूरातील कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहतीत पाच वर्षांपूर्वी २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घडलेली ही अतिशय क्रूर अशी घटना आहे. दारूच्या आहारी गेलेला सुनिल कोचीकोरवी हा आपल्या ६५ वर्षीय वृद्ध आईकडे रोज दारूसाठी पैसे मागत असे. व्यसनाधिन मुलगा आणि घरात कमावते कोणीच नाही. त्यामुळे आईतरी पैसे कोठून देणार ? पण याची जाण या निर्दयी मुलाला कधीच झाली नाही. घटनेदिवशी त्याने आपल्या निष्ठूरतेचा कळसच गाठला. आईने पैसे देण्यास नकार देताच चाकू, सुरी आणि सत्तूरने आईवर सपासप वार करुन निर्घुण खून केला. यावरच तो थांबला नाही. तर त्याने मृतदेहाचे तुकडे केले. आणि ते शिजवून खाल्ले.

सुनिलच्या घरात काहीतरी विपरीत घडत आहे याची शंका शेजाऱ्यांना आली. त्यांनी घरात पाहण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा सुनिल पळून जाऊ लागला. त्याला पकडले आणि शाहुपुरी पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी त्याने केलेला हा भयानक प्रकार उघडकीस आला. या खूनचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला.

तत्कालीन पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी सपोनि. सुरेश परीट, हवलदार एस. एम. नाईक यांच्या सहकार्याने तपास केला. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले. जिल्हा व सत्र न्यायाधिश महेश जाधव यांच्यासमोर हा खटला चालला. तपासात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. पण परिस्थितीजन्य पुरावे आणि महत्वपूर्ण असे बारा साक्षीदार तपासले. त्यांच्या साक्षी आणि सरकारी वकील विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिश महेश जाधव यांनी आरोपी सुनिल याला मरेपर्यंत फाशी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायाधिशांनी आपल्या निकालपत्रात, कोल्हापूर देवी अंबाबाईचे वास्तव्य असलेली भूमी आहे. अशा पवित्र भूमित मातेच्या निष्ठूरपणे केलेल्या खूनाचा समाजमनावर परिणाम होऊ नये यासाठी अशा प्रवृत्तीला कठोरात कठोर शिक्षा होणार असल्याचे म्हटले आहे.