नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘धोनीसारखे तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणे कुठल्या भारतीय कॅप्टनला जमणार असे वाटत नाही’ असे गंभीर म्हणाला. कदाचित कोणी रोहित शर्मापेक्षा जास्त द्विशतक मारेल. विराट कोहलीपेक्षा जास्त शतक झळकवेल; पण कुठल्या भारतीय कर्णधाराला धोनीसारखे आयसीसीची तीन विजेतेपद मिळवून देणे जमेल असे वाटत नाही,’ असे गौतम गंभीर याने म्हटले आहे.

टी-२०  वर्ल्ड कप २०२२  मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास संपुष्टात आल्याने चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. इंग्लंड विरुद्धच्या पराभवानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. गौतम गंभीरला एमएस धोनीची आठवण झाली. भारताच्या पराभवानंतर गंभीरने एमएस धोनीबद्दल एक विधान केले. प्रत्येकजण त्या विधानाशी सहमत आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियाने सर्वप्रथम २००७ साली टी-२० वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवले. त्यानंतर २०११ साली वनडे वर्ल्ड कप आणि २०१३ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीशिवाय क्रिकेट विश्वातील कुठल्याही अन्य कॅप्टनला असा कारनामा करणे जमलेले नाही.

धोनीनंतर विराट कोहलीने भारताचे नेतृत्व सांभाळले; पण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. २०१७ मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली होती; पण पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर २०१९ साली भारताचा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीमध्ये पराभव झाला. २०२१ मध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. २०२१ टी-२० वर्ल्ड कपच्या साखळीतच भारताचा पराभव झाला.