कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळी अभ्यंगस्नानाचे स्वप्ने दाखवून कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात आले. पालकमंत्री पद, महापालिकेत सत्ता उपभोगताना पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसले नाही काय? कुचकामी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? असा सवाल उपस्थित करत थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता? असा प्रतिसवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना केला. आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या व्यक्तव्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिसवाल उपस्थित केला.
या पत्रकात म्हंटले आहे कि, सन २०१२ मध्ये योजनेस तांत्रिक मान्यता देण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता होवून प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. त्यावेळी आमदार सतेज पाटील पालकमंत्री होतेच यासह महानगरपालिकेत त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती. ही योजना तब्बल १० वर्षांनी कार्यन्वित झाली. दिवाळीचे अभ्यंगस्थान योजनेच्या पाण्याने करून श्रेय घेण्यात आमदार सतेज पाटील सर्वात आघाडीवर होते. पण त्यानंतर पाईपलाईनला वारंवार लागणारी गळती, यंत्रणा बंद पडण्याच्या घटनांबाबत अबोला धरला होता. त्यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांनी या योजनेत सुमारे ७० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. याबाबतही आमदार पाटील यांनी मौन बाळगले आहे. गळकी थेटपाईपलाईन योजना जनतेच्या माथी मारण्याचे काम करणारे आमदार सतेज पाटील योजनेचे अपयश लपविण्यासाठीच जनतेत दिशाभूल करणारी वक्तव्ये करत आहेत.
शहरातील वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. ही वितरण व्यवस्था सुधारण्याची जबाबदारी त्यांनी महापालिकेत सत्तेत असताना, पालकमंत्री पद असताना का घेतली नाही. स्वत: केलेले पाप महापालिका प्रशासनाच्या माथी मारण्याचे काम आमदार पाटील करत आहेत. योजनेचे डिझाईन, काम सन २०४५ ची लोकसंख्या गृहीत धरून करण्यात आले. काम करणारी ठेकेदार कंपनी, सल्लागार कंपनी आमदार सतेज पाटील सत्तेत असतानाच नेमण्यात आली होती. काम योग्य पद्धतीने होते कि नाही हे तपासण्याची पण त्यांची तितकीच जबाबदारी होती. पण हीच जबाबदारी पार पाडता न आल्याने आमदार पाटील जनतेची दिशाभूल करत आहेत.
महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात होणारे विकासाचे काम जनता पाहत आहे. पण स्वत:चा अकार्यक्षमपणा लपविण्यासाठी महायुतीच्या विकासाच्या कामांना विरोध करणे, टीका करणे हेच काम आमदार सतेज पाटील यांच्याकडे शिल्लक राहिले आहे. महायुती कोल्हापूरच्या विकासासाठी सक्षमपणे काम करत असून, त्यांचेच फलित म्हणून विधानसभा निवडणूक लोकांच्या विश्वासावर एकतर्फी जिंकण्यात महायुती पात्र ठरली आहे. त्यामुळे आगामी काळातही कोल्हापूरकर विकासाच्या उद्देशाने मार्गक्रमण करणाऱ्या महायुतीच्या पाठीशी ठाम राहतील.
कोल्हापूरच्या जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर एखादी यंत्रणा सुधारायचीच असेल तर त्याचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर आणि आम्ही महायुतीचे सर्वच आमदार प्रशासनावर वचक ठेवून जनतेची कामे करून घेत असल्यानेच माजी पालकमंत्री यांना त्यांचा अकार्यक्षमपणा जाणवत असल्याने त्यांना आम्ही करण्याऱ्या कामाचे पोटशूळ उठले आहे, असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.