कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक जनसुराज्य पक्षाचे प्रमुख व आ. विनय कोरे यांच्यासोबत लढवली. मात्र, पैसे दिले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत नव्हतो, असा खुलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (गुरूवार) येथे केला. ते पत्रकारांशी बोलत होते.

आ. कोरे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पक्षाचा महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला ३५ लाख दिल्याची कबुली दिली. यावेळी मी आणि हसन मुश्रीफ एकत्र होतो. तर विरोधात बंटी पाटील आणि महादेवराव महाडिक एकत्र होते, असे सांगितले. यावर राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. दरम्यान, याबाबत मंत्री मुश्रीफ यांना छेडले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले की, त्यावेळी आम्ही आ. कोरे यांच्यासोबत होतो. पण पैसे दिले. त्यावेळी मी त्यांच्यासोबत नव्हतो. तसेच कोरे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.