भारतात चहाची आवड अनेकांना आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरुच होत नाही. काही लोक तर दिवसभरात 3-4 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहा पितात. तर असे अनेक संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात. तसेच, अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मात्र, असे काही लोक आहेत जे बऱ्याचदा खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा तो चहा पितात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते माहिती आहे का तर चला जाणून घेऊया या लेखात

चहा वारंवार गरम करून पिण्याचे नुकसान

अनेकांच्या घरी चहा एकदा बनवल्यानंतर तो, उरला तर पुन्हा गरम करून प्यायला जातो. असं करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर आताच सावध व्हा. कारण, ही सवय धोक्याची सूचना आहे. चहा वारंवार गरम केल्यास त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. तर, बऱ्याच वेळापासून बनवून ठेवलेल्या चहामध्ये टॅनिनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळं चहा कडू होत जातो. चहा तयार केल्यानंतर तुम्ही तो तीन ते चार तासांनंतर पित असाल तर, त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा चहामध्ये अनेकदा बॅक्टेरिया वाढतात. चहा वारंवार गरम केल्यास त्यातील पोषक तत्त्वं नष्ट होण्यासोबतच अपचन, पोट फुगणं, मळमळणं, पोटदुखी या आणि अशा काही समस्या सतावू लागतात. दुधाचा चहा असल्याच त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो. ज्यामुळं अनेकदा आतड्याचे विकार आणि पोटाचं आरोग्य बिघडतं. त्यामुळं चहा बनवल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटांच्या आत पिऊन संपवणं अपेक्षित असतं.