कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सिजन मागवणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन टँकर भाड्याने घ्यावेत. त्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे त्वरित पाठवावे, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (सोमवार) दिली. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि उद्योजकांसोबतच्या बैठकीत बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांनी वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजन सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जिल्ह्याची एकूण मागणी आणि पुरवण्यासाठी वाढीव उत्पादन करावे. उद्योजक असोसिएशनने एकत्रपणे बैठक घेवून उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी टँकर भाड्याने घ्यावा. त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात येईल. पुणे येथील इनॉक्स, टीएनएस या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपाध्यक्षांशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सीपीआर रुग्णालयात पाच मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचे तसेच कोल्हापूर मधील ऑक्सिजन पुरवठादारांना वाढीव ऑक्सिजन पुरविले जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महालक्ष्मी प्रायव्हेट लिमीटेडचे जितेंद्र गांधी, रणजित शहा, विश्वास पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे, कोल्हापूर गॅसचे राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.