जबलपूर :  येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात शिवाजी विद्यापीठाने महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर संघाचा ५ गोलने पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक केली. 

सामन्याच्या सुरवातीपासूनच शिवाजी विद्यापीठ संघाने खेळावर ताबा ठेवला. १२ व्या मिनिटाला सिध्देश साळोखेने मोठ्या ‘डी’ बाहेरून मारलेला फटका संघाला १ गोलची आघाडी मिळवून गेला. त्यानंतर आक्रमणाची धार कायम ठेवत २१ व्या मिनिटाला प्रथमेश बाटे याच्या पासवर केवल कांबळेने संघाचा दुसरा गोल केला. लगेचच ३८ व्या मिनिटाला सिध्देश साळोखेने वैयक्तिक दुसरा गोल करुन संघाला तिसऱ्या गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी कायम राहिली. मध्यंतरानंतर ५८ व्या मिनिटाला रोहित पोवारचे पासवर केवल कांबळेने वैयक्तिक २ रा व संघाचा ४ था गोल केला. ६८ व्या मिनिटाला प्रथमेश बाटे याच्या पासवर बदली खेळाडू निरंजन कामतेने ५ वा गोल करुन शिवाजी विद्यापीठ संघास ५ गोलने विजय मिळवून दिला. संघाचा कर्णधार प्रतीक बदामे, रोहित देसाई, स्वयम साळोखे, प्रथमेश बाटे यांनी चांगला खेळ केला.