कागल ( प्रतिनिधी ) आयुष्यमान भारत ही देशातील गोरगरिबांना प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना राबविण्यात आणि योजनेची उद्दिष्टपुर्ती करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात आणि कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ देशात अव्वल ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वाटपाच्या प्रारंभ कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. पालकमंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, आरोग्यसेवा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामधील ६५ दवाखाने समाविष्ट आहेत. यामधून १,२०९ आजारांचे प्रत्येक कुटुंब मागे पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी जनजागृती आणि प्रबोधनाच्या माध्यमातून क गोल्डन कार्ड नोंदणीसाठी जनतेला प्रबोधित करावे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, गट विकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच; सेनापती कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी, नानीबाई चिखली, सिद्धनेर्ली, पिंपळगाव बुद्रुक या प्राथमिक आरोग्य केंद्रांकडील सर्व आरोग्य कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.